गावाविषयी माहिती

मंदाग्नी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले देवघर हे गाव महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यात वारकरी पंरपरा लाभलेले हे गाव आहे. गावात विठ्ठल रुखमाई मंदीर असून गावाची वारकरी परंपरा आणि संस्कृती जोपासणारे हे केंद्रबिंदूस्थान आहे. त्याच प्रमाणे गावातील पाडयांमध्ये विविध मंदिरे असून गावक-यांचे श्रध्दास्थान आहे. एक गाव एक गणपती अशी गावाची 100 वर्षाची परंपरा आहे. गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1120 आहे.

गावात जिल्हा परिषद शाळा, हायस्कुल, डी एड कॉलेज, लॉ कॉलेज आहे. गावात सार्वजनिक विहीरी, पाणी पुरवठा नळ योजना अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. शैक्षणिक व धार्मिक, सामाजिक वसा या गावास लाभला आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून टॉमॅटो, मिरची, फुल शेती अशी पिके घेतली जात असून मुख्य पिक हे भात आहे. या पिकांमधून शेतक-यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. या बरोबरच कुकुटपालन देखील गावात मोठया प्रमाणात होत आहे. त्यातुन चांगले उत्पन्न शेतक-यांस मिळत आहे. तसेच देवघर गाव हे आदिवासी (पेसा) क्षेत्रात येत असल्याने येथे आदिवासी संस्कृतीचे जन केले जाते. तसेच रुढी व परंपरेची जोपासना होते.

भौगोलिक स्थान

देवघर हे गाव वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 19 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ 904.83 हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये 3 वार्ड आहेत. एकूण 362 कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या 1120 आहे. त्यामध्ये 590 पुरुष व 530 महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट व डोंगराळ प्रदेशात असून शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत अवघ्या गोई  नदी असून  ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः 41°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात 15°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी 1000 ते 1200 मी.मी. पर्जन्यवृष्टी होते. देवघर गावामध्ये भातशेती मोठया प्रमाणात केली जाते.  

लोकजीवन

देवघर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून फुल शेती व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत. गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि  गावात भरवला जाणारा साप्ताह  गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देवघर गावाचे लोकजीवन पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

तपशील संख्या
लोकसंख्या ११२०
पुरुष ५९०
स्त्री ५३०
एकूण ११२०

संस्कृती व परंपरा

देवघर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच गावात 7 दिवसांचा वारकरी सांप्रदायाचा वसा टिकवण्यासाठी सप्ताह साजरा केला जातो. त्यामध्ये भजन, किर्तन, हरिपाठ व गावातील प्रमुख देवतांची पुजा अर्चा केली जाते. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे देवघर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

  • विठ्ठल रुख्मिणी मंदिर – गावातील मुख्य मंदीर असून गावक-यांचे श्रध्दा स्थान असून येथे दरवर्षी फाल्गून शु. विनायक चर्तुर्थीला सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • दत्त मंदिर –  दत्त मंदीर गावातील लोकांचे श्रध्दास्थान असून येथे दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव श्रध्देने पार पाडला जातो.  
  • संत तुकाराम मंदिर – संत तुकाराम मंदीर लोकांचे श्रध्दास्थान असून येथे दरवर्षी संत तुकाराम बीज मोठया श्रध्देने व उत्साहाने पार पाडला जातो.  
  • वेताळ मंदीर –  हे गावातील जागृत देवस्थान असून दरवर्षी या मंदीरात श्रध्देने व उत्साहाने पुजा केली जाते. 
  • गावदेवी मंदीर –  गावातील  मुख्य जागृत देवस्थान असून दरवर्षी या मंदीरात श्रध्देने व उत्साहाने पुजा केली जाते. 

जवळची गावे

देवघर गावाजवळ गुंज व काटी ही गावे असून ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक व सांस्कृतीक जोपासलेली गावे आहेत. गुंज गाव हे पुरातन बालयोगी श्री परशुराम मंदिरासाठी प्रसिध्द असून काटी हे गांव भागिर्थी मंदिरासाठी प्रसिध्द आहे.